झेंग्झू : चीनमधील सर्वात मोठ्या आयफोनच्या प्रकल्पातून चिनी कामगार भिंत चढून पळ काढत आहेत. फॉक्सकॉनच्या मालकीच्या प्लांटमधून कामगार बाहेर पडतानाचा व्हिडीओ चिनी सोशल मिडियावर शेअर होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे फॉक्सकॉनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर चीनने झेंग्झू येथील जगातील सर्वात मोठ्या आयफोन प्लांटमध्ये कडक निर्बंध जाहीर केले आहेत. या कंपनीमध्ये सुमारे 3,00,000 कर्मचारी काम करतात आणि जगातील सर्वाधिक आयफोन या कारखान्यात बनतात. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे फॉक्सकॉनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामगार भिंत चढून पळ काढत असल्याची माहिती समोर आली आहे.
चीनमध्ये 2019 पासून कोरोना लॉकडाऊनची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे आयफोन बनवणाऱ्या कारखान्यातील कामगार कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी जाण्यासाठी उतावीळ झाले आहेत. म्हणूनच त्यांना कंपनीतून पळ काढावा लागत आहे. ते रात्री-अपरात्री आपले सामान-सुमान हातात-खांद्यावर घेऊन आपल्या घराचा रस्ता पकडत आहेत.
यूएस-आधारित ॲपल कंपनीला पुरवठादार म्हणून फॉक्सकॉन काम करते, फॉक्सकॉनच्याच झेंग्झू कॅम्पसमध्ये हजारो कर्मचारी आहेत. चीनच्या कठोर शून्य-कोविड धोरणांतर्गत शहरे कोरोनामुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊनसोबतच लोकांच्या बाहेर जाण्यावर आणि प्रवासावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.